Thursday, May 12, 2011

बॉलर्सचे बकरे...

क्रिकेट म्हणजे बॉल व बॅटचे युद्धच असते. या युद्धात बॉलर्स अर्थात गोलंदाज व बॅट्समन अर्थात फलंदाज हे योद्धे म्हणून गणले जातात. क्रिकेटच्या इतिहासात डोकावून पाहिले असता असे दिसून येते की, बऱ्याचदा फलंदाजांना काही विशिष्ट गोलंदाजांचे चेंडू नीट खेळून काढता येत नाहीत व अशाच गोलंदाजांना ते आपली विकेट बहाल करतात. तसेच गोलंदाजांनाही एखाद्या विशिष्ट फलंदाजाला चकविणारा चेंडू कसा टाकायचा व त्याची विकेट कशी घ्यायची, हे बरोबर ठावूक असते. अशाच काही फलंदाज-गोलंदाजांच्या जोड्या क्रिकेटच्या इतिहासात प्रसिद्ध होत्या व काही आजही आहेत. मागच्या दोन दशकांत प्रसिद्ध असणाऱ्या ह्या जोड्यांचा घेतलेला हा आढावा...

इंग्लंड व ऑस्ट्रेलियामध्ये होणारी प्रसिद्ध कसोटी मालिका म्हणजे ऍशेस होय. क्रिकेटच्या इतिहासात ह्या मालिकेला मोठे महत्व दिले जाते. एकेकाळी ही मालिका जिंकणारा संघ कसोटी क्रिकेटचा विश्वविजेता संघ मानला जायचा. ऍशेसमध्ये इंग्लिश व ऑस्ट्रेलियन गोलंदाज व फलंदाजांची रंगतदार लढत पाहायला मिळते. ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅकग्राथने बऱ्याचदा अनेक इंग्लिश फलंदाजांना जेरीस आणले होते. त्यातीलच एक म्हणजे इंग्लंडचा सलामीचा फलंदाज मायकेल आथर्टन होय. या दोघांची झुंज पाहायला वेगळीच मजा असायची. पण, या लढतींमध्ये बहुतांश वेळा मॅकग्राथची सरशी झालेली आहे. म्हणजेच तब्बल १९ वेळा मॅकग्राथने आथरटनला ऍशेसमध्ये बाद केले आहे. विशेष म्हणजे एखाद्या गोलंदाजाच्या नावावर असलेला हा विश्वविक्रम होय. ग्लेन मॅकग्राथच्या नावे असाही एक विश्वविक्रम आहे, याची माहिती बहुतेक कमी जणांना असेल. मॅकग्राथ-आथरटन प्रमाणेच आणखी एक प्रसिद्ध जोडी म्हणजे शेन वॉर्न व दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डॅरील कलिनन...!!! शेन वॉर्नने आपल्या करियरमध्ये अनेक फलंदाजांना त्रास दिला परंतु, कलिनन इतका त्रास त्याने कोणालाच दिला नसेल. शेन वॉर्नचा टॉप बकरा म्हणून कलिनन प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे वॉर्न खेळत असताना कलिननने ऑस्ट्रेलिया विरूद्ध एकही शतक ठोकलेले नाही...!!!

भारतीय बॉलर्सचा विचार केला तर एखाद्या फलंदाजाला बकरा बनविण्यात झहीर खान हा आघाडीवर आहे. दक्षिण आफ्रिकेच्या ग्रॅमी स्मिथला त्याने आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तब्बल १३ वेळा बाद केले आहे. विश्वचषकात या दोन देशांमध्ये झालेल्या साखळी सामन्यात झहीरने स्मिथला तेराव्यांदा बाद केले. दक्षिण आफ्रिकेचाच सलामीवीर ऍन्ड्र्यु हडसन हा भारताच्या जवागल श्रीनाथचा बकरा समजला जाई. श्रीनाथने त्याला सात वेळा बाद केले होते. २००१ मध्ये झालेल्या कसोटी सामन्यांत हरभजन सिंगने ऍडम गिलख्रिस्टला सलग चार वेळा १ व ० च्या धावसंख्येवर बाद केले होते. पारंपारिक प्रतिस्पर्धी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या भारत-पाकिस्तानमध्ये मात्र बॉलर्सचे बकरे प्रसिद्ध झाले नाही. पण, १९९७ साली झालेल्या टोरॅन्टोमधील ’सहारा कप’ मध्ये सौरव गांगुलीने पकिस्तानच्या सलिम मलिकला सहा सामन्यांत पाच वेळा बाद केले होते. हा देखील एक विश्वविक्रमच आहे. सौरव गांगुलीच्या नावे गोलंदाजीचा असणारा हा एकमेव विक्रम होय. याच चषकामध्ये त्याने १६ पाकिस्तानी फलंदाजांना बाद केले होते. एखाद्या भारतीय गोलंदाजाची पाकविरूद्ध सर्वोत्तम गोलंदाजी सौरवने याच ठिकाणी केली होती. आजही हा भारतीय विक्रम अबाधित आहे.

आपल्या सचिनविषयी बोलायचं तर सर्वात जास्त वेगवेगळ्या गोलंदाजांकडून बाद होण्याचा विश्वविक्रम कदाचित सचिनच्या नावे जमा होईल. कारण, इतके सामने खेळुनही त्याला अजुन एकाही फलंदाजाने १० पेक्षा अधिक वेळा बाद केलेले नाही. सचिनला श्रीलंकेच्या चामिंडा वासने आठ वेळा बाद केले आहे.

याशिवाय अन्य फलंदाजांबद्दल कोणाला अधिक माहिती असल्यास कृपया सांगावे...

1 comment:

  1. आज काल हरभजन ही पोंटिंग ची विकेट जास्त घ्यायला लागलाय. माझ्या मते त्याने आता पर्यंत ७ वेळा पोंटिंग ला बाद केले आहे. म्हणूनच तर तो त्याच्यावर जास्त खुन्नस खातोय ना !!!

    ReplyDelete

to: tushar.kute@gmail.com