Sunday, July 4, 2010

थुंक्यांसाठी चार कोटी

आपल्या देशाला घाण करण्यात सगळ्यात जास्त मोठा वाटा हा आपले राजकारणी व रत्यावर इकडे तिकडे थुंकणाऱ्या लोकांचा आहे, यात शंका नाही. आपले राजकारणी निर्लज्जच असल्याने व त्यांच्याबद्दल आत्तापर्यंत बरेच काही लिहून झाले असल्याने त्यात आणखी काही लिहिण्यात मजा नाही.

परवाच ’सकाळ’मध्ये एक बातमी वाचली. मुंबई उपनगरीय रेल्वेमध्ये आता डबे स्वच्छ करण्यासाठी एका खासगी कंपनीला दोन वर्षाचे कंत्राट देण्यात आले आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासन तब्बल चार कोटींपेक्षा जास्त रक्कम या कंपनीला अदा करणार आहे. शिवाय रेल्वेचा एक डबा धुण्यासाठी पाचशे लिटर पाणीही लागणार आहे. रेल्वेचे डबे घाण करण्यात प्रामुख्याने गुटखा किंवा अन्य चघळण्याचे पदार्थ खावून थुंकणाऱ्यांचा मोठा सहभाग आहे. म्हणजेच गुटखा खावून थुंकलेले साफ करण्याकरिता आता दोन वर्षात रेल्वे प्रशासन चार कोटी रक्कम खर्च करणार आहेत! पण, हे डबे साफ झाल्यानंतर पुन्हा काही दिवसांतच थुंकणारे तो डबा घाण करण्यात सज्ज होतील, यात वाद नाही. म्हणजेच रेल्वे प्रशासन दरवर्षी दोन कोटी फुकट घालविणार आहे!

आपल्या देशात सार्वजनिक मालमत्ता म्हणजे गुटखा खावून थुंकणाऱ्यासाठी एक हक्काची जागा असते. केवळ रेल्वेच नाही तर सर्वच सार्वजनिक वाहतुकीच्या सुविधा, स्थानके ही थुंके लोकांनी घाण केलेली आहेत. राज्य बससेवा, शहर बससेवा व रेल्वेमध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये गुटखा खावून थुंकल्याचे दिसून येते. पुड्यांमध्ये मिळणाऱ्या ह्या गुटख्यावर काही वर्षांपूर्वी आपल्या राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी बंदी घातली होती. परंतू, थोड्याच दिवसांत त्या गुटख्याचे नाव बदलून वेगळ्या नावाने व निराळ्या प्रकारच्या पुडीत तो विक्रीस येवू लागला. त्यामुळेच या गुटख्याला आवर घालणे कठीण आहे, हे लक्षात आल्याने शासनानेही त्याकडे नंतर फारसे लक्ष दिले नाही. चौकाचौकात अतिक्रमित जागेवर थाटलेली टपरीसदृश दुकाने याच गुटख्याच्या विक्रीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत. व आपल्या देशात चघळण्याचे पदार्थ खाणारा एक मोठा शौकिनवर्ग तयार झालेला आहे. या शौकिनांची खोड मोडणे आगामी काळात एक कठीण काम आहे.

आमचे थुंकेबहाद्दर केवळ थुंकण्यावरच थांबत नाहीत तर गुटख्याच्या पुड्याही ते सरळ रस्त्यावर फेकून देतात. आपल्या रस्त्यांवर व सार्वजनिक बसस्थानक, रेल्वेस्थानकांवर रस्त्यावर पडलेल्या पुड्यांची पाकिटे मोठ्या प्रमाणात दिसून येतात. शहर घाण करण्यात याच पुड्यांचा एक मोठा वाटा झाला आहे. एका पुडीने मिळणारा आनंद आपले पूर्ण शहरच घाण करत आहे, याची जाणीव गुटखा खाणाऱ्यांना निश्चितच नाही. सध्या तरी गुटखा नावाच्या या पदार्थावर बंदी घालणे अवघड दिसते. कोणीतरी या पुड्यांमध्ये जुलाबाचे औषध टाकावे, म्हणजे हा प्रश्न थोडा का होईना आटोक्यात येण्याची शक्यता वाटते!

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com