Friday, June 25, 2010

सकारात्मकतेकडे नेणारा: झिंग चिक झिंग

झी मराठीच्या झी गौरव पुरस्कारांमध्ये अनेक चित्रपटांच्या स्पर्धेला ’झिंग चिक झिंग’ हा चित्रपटही होता. तोपर्यंत मी हा चित्रपट पाहिला नव्हता. परंतु, बरीच नामांकने मिळाल्याने चित्रपट उत्तम असणार याद वादच नव्हता. नावाने विनोदी वाटणारा हा चित्रपट विनोदी मात्र नाहीच. उलट शेतकऱ्यांची आत्महत्या हा आजच्या ज्वलंत व गंभीर विषयाला हात घालणारा चित्रपट आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर मराठीमध्ये यापूर्वी ’गाभ्रीचा पाऊस’ व ’गोष्ट छोटी डोंगराएवढी’ असे दोन दर्जेदार चित्रपट येऊन गेले आहेत. त्यामुळे, ’जुनी कढई व नवा भात’ अशी अवस्था या चित्रपटाची होणार नाही, याकरिता दिग्दर्शकाने मोठी मेहनत घेतल्याचे दिसून आले. या तिन्ही चित्रपटाचा विषय जरी एक असला तरी तिन्हींमध्ये वेगवेगळी परिमाणे वापरण्यात आल्याने त्यांत तोचतोचपणा बिलकुल जाणवत नाही. उलट, ’झिंग चिक झिंग’ पाहिल्यावर एक वेगळे चित्र पाहिल्याचे समाधान लाभते. याचे सर्व श्रेय चित्रपटात गुंतलेल्या प्रत्येक व्यक्तीला आहे. दिग्दर्शक नितिन नंदनचा हा एक उत्तम चित्रपट आहे.
भरत जाधवच्या अंगचे खरे अभिनयगुण या चित्रपटाच्या निमित्ताने दिसून आले. अगदी तंतोतंत शेतकरी त्याने वठवला आहे. त्याच्या अभिनयात कुठेच कृत्रिमता दिसून येत नाही. डोळ्यातील भाव, अंगातील पेहराव व खुरटलेली दाढी यातून तो आपल्या अभिनयचे प्रदर्शन करतो. एका शेतकऱ्याच्या अंगच्या प्रत्येक हावभावाला त्याने टिपले आहे. त्याला साथ द्यायला माधवी जुवेकरही तितकीच साजेशी वाटली. बऱ्याच दिवसांनी तीलाही एका उत्कृष्ट भूमिकेत बघायला मिळाले. सर्वात जास्त कौतुक करावेसे वाटते ते चिन्मय कांबळी या बालकलाकाराचे. बहुतांश चित्रपट त्याच्या भोवतीच गुंफलेला आहे. म्हणूनच, त्याच्या भूमिकेला चित्रपटात सर्वात मोठे आव्हान होते. ते त्याने समर्थपणे पेललेल्याचे दिसून आले. लहान मुलाच्या अंगातील निरगसता त्यानेही हुबेहूब वठविली आहे. झी गौरव मध्ये त्याला ही सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचे नामांकन प्राप्त झाले होते. पण, ’बोक्या सातबंडे’ चित्रपटासाठी आर्यन नार्वेकर याला हा पुरस्कार मिळाला. ही हे दोन्ही चित्रपट पाहिले आहेत. मला जर पुरस्कारासाठी कोणाची निवड करावी, असा प्रश्न पडला असता तर मी निश्चितच पहिला क्रम ’झिंग चिक झिंग’ साठी चिन्मय कांबळीला दिला असता. इतका सुंदर अभिनय त्याने केला आहे. मराठीत नावारूपात आलेल्या बालकलाकारांमधील तो एक उत्कृष्ट कलाकार आहे. चित्रपटात बहिण म्हणून आरती मोरेने त्याला दिलेली साथही तितकीच मोलाची आहे.
प्रगत शेतकरी असणारे दिलिप प्रभावळकर व शाळेतील शिक्षक संजय मोने यांच्या भूमिकाही चांगल्याच लक्षात राहतात. संजय मोनेंचा टिपिकल ग्रामीण शिक्षक पाहून खरोखर ते शिक्षक असावेत, असे राहून राहून वाटते. चित्रपटातील प्रसंग टिपण्यासाठी दिग्दर्शकाने बरीच मेहनत घेतल्याचे दिसून येते. ही बाब अगदी छोट्या छोट्या प्रसंगातूनही दिसून आली. असेअभ्यासू दिग्दर्शक मराठी चित्रपटसृष्टीला लाभत आहेत, हे आपले भाग्यच मानावे लागेल.
कोणत्याही कटीण प्रसंगातून मार्ग काढता येतो, हा संदेश या चित्रपटाने दिला आहे. नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे नेणरा चित्रपट म्हणून याचे वर्णन करता येईल.

1 comment:

  1. This is a nice analysis. I also watched the movie. I think, Marathi movie makers are mde very professional today.

    ReplyDelete

to: tushar.kute@gmail.com